Small Business

आपल्या व्यवसायासाठी उत्तम कर्मचारी कसे मिळवायचे?

आपल्या व्यवसायासाठी उत्तम कर्मचारी कसे मिळवायचे?

सोशल मिडियाचा वापर केवळ प्रमोशन पुरता मर्यादित न ठेवता उत्तम कर्मचारी शोधण्याकरतासुद्धा केला तर..!

आजकाल आपण पाहतो की स्टार्टअप्स मोठ्या संख्येने उभे राहत आहेत. त्यातील काहींच्या संकल्पना खूप उत्तम आहेत तर काहींचे संस्थापक आपल्या कौशल्यांचा वापर करून साध्यातल्या सध्या उद्योगातून मोठा नफा कमाविण्याची क्षमता दाखवत आहेत. इतकी मोठी ताकद स्टार्टअप्स मध्ये असतानाही त्यातले बरेच स्टार्टअप्स बंद का पडतात?

स्टार्टअप्सच्या यशाचे गणित हे त्यात काम कराऱ्या लोकांच्या उत्पादकतेशी प्रत्यक्षरित्या संबंधित असते. जितके उत्पादक, कुशल आणि मोठा विचार करणारे लोक, तितका तो उद्योग मोठमोठा होत जातो.

परंतु आडचण अशी असते की सुरुवातीच्या काळात कमी बजेट मुळे ना आपण मोठा पगार देऊन तज्ञांना कामावर ठेऊ शकतो ना आपल्या उत्पादकतेशी तडजोड करू शकतो. मग अशा वेळी आपल्या ओळखीतल्या कुणालातरी कामावर ठेवले जाते किवा त्या कामासाठी योग्य नसलेल्या एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते. बर्याचदा आपल्याला हवे तसे कर्मचारी मिळत नाहीतच उलट आपल्यालाच त्या कामात जास्त लक्ष घालावे लागते आणि शेवटी वेळ फुकट जातो.

हे सर्व जर टाळायचे असेल तर उत्तम कर्मचाऱ्यांची निवड करणे गरजेचे आहे. यासाठी आपण एखाद्या एजन्सीची मदत घेऊ शकतो पण त्यात खर्च सुद्धा जास्त येतो. यासाठी दुसरा पर्याय म्हणजे सोशल मिडिया. आजच्या आधुनिक युगात आपण आपली उत्पादने विकण्यासाठी, ग्राहकांशी उत्तम नाते निर्माण करण्यासाठी सोशल मिडिया वापरतो. त्याचप्रमाणे उत्तम कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्यासाठी सुद्धा सोशल मिडीयाचा वापर आपण करू शकतो.

उत्तम कर्मचाऱ्यांना सोशल मिडियाद्वारे आकर्षित करण्यासाठी आपण पुढील पर्याय वापरू शकतो:

१. लोकांना व्हर्च्युअली आपल्या ऑफिस मध्ये आणणे
कोणत्याही व्यक्तीला आपण जिथे नोकरीसाठी अर्ज करतो तेथील वातावरण जाणून घ्यायचे असते. तर मग आपणच जर सोशल मीडिया मार्फत त्यांना हे पुरवले तर! आपल्या ऑफिस मधील कर्मचाऱ्यांचे काम करतानाचे फोटोज सोशल मीडिया वर अपलोड करणे, आपल्या ऑफिस मधील विशेष सेवांची माहिती पोस्ट करणे तसेच आपल्या संथापकांचे कर्मचार्यांसोबत काम करतानाचे, विविध ट्रेनिंग्सचे, वगैरे फोटोज किंवा व्हिडीओज शेअर करणे अशा अनेकविध गोष्टींतून आपण लोकांना ग्राहक म्हणूनच नाहीत तर आपल्या उद्योगातील भविष्यातले कर्मचारी म्हणूनही आकर्षित करू शकतो.

२. आपल्या आताच्या कर्मचार्यांतर्फे प्रमोशन
कोणतीही व्यक्ती एखाद्या संस्थापकाकडून त्याच्या उद्योगाचे कौतुक ऐकण्यापेक्षा त्यातील कर्मचाऱ्यांच्या तोंडून निघालेल्या कौतुकावर जास्त विश्वास ठेवते. त्यामुळे आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे ऑफिस मधील अनुभव जास्तीत जास्त शेअर करण्यास उद्युक्त करा. यालाच ‘वर्ड ऑफ माऊथ’ प्रमोशनसुद्धा म्हणतात. कर्मचाऱ्यांना आकर्षित करण्याशिवाय इतर लोकांमध्ये सुद्धा यामुळे आपल्या उद्योगाबद्दल विश्वास निर्माण होईल.

३. आपल्या उद्योगातील वातावरण जगाला दाखवा
लोकांच्या मनात कायम भीती असते की बाहेरून जरी एखादे ऑफिस छान दिसत असेल तरी त्याच्या आतील वातावरण कसे असेल. त्यामुळे आपण आपल्या ऑफिस मध्ये जर कोणते सण साजरे करत असाल किंवा इतर वेगळ्या कोणत्या स्पर्धांचे आयोजन करत असाल तर त्याची छायाचित्रे आपल्या सोशल मीडिया वर जरूर शेअर करा. यामुळे लोकांना आपल्या उद्योगाबद्दल आपलेपणा वाटू लागेल.

४. विविध फॉर्म्सचा वापर
आपण जेव्हा एखाद्या पदासाठी योग्य व्यक्ती निवडत असाल तेव्हा त्या पडसंदर्भात एखादी प्रश्नावली तयार करा. गुगल फॉर्म हे डिजिटल प्रश्नावली तयार करण्याचे सर्वात सोपे मध्यम आहे. ही प्रश्नावली आपल्या सोशल मीडिया वरून शेअर करा. लोकांना मजा म्हणून ती स्पर्धा देऊ द्या. आम्हाला कर्मचारी हवे आहेत त्यासाठी ही स्पर्धा असे अजिबात सांगू नका. यामुळे लोक मुक्तपणे ही प्रश्नावली सोडवतील. यात लोकांचे फोन नंबर किंवा ई-मेल घ्यायला विसरू नका! स्पर्धा संपल्यावर त्याचे निकाल सोशल मीडिया वर पोस्ट कराच शिवाय ज्यांनी उत्तम अशी उत्तरं दिली असतील त्यांना फोन/ ई-मेल द्वारे कामासाठी संपर्क करा.

५. हॅश टॅगचा वापर (#)
कोणत्याही सोशल मीडियावर हॅशटॅग हे इतर शब्दांपेक्षा जास्त लोकांपर्यंत पोचतात. त्यामुळे आपण आपल्या वेगवेगळ्या पोस्ट्स मध्ये त्याचा वापर करू शकता. जसे आपल्या आताच्या कर्मचाऱ्यांना #LifeAtSmartudyojak असे टॅग्स वापरायला सांगणे किंवा एखाद्या पदासाठी कर्मचारी नेमण्याची पोस्ट असल्यास #JobOpportunity असा हॅशटॅग सुद्धा आपण वापरू शकता. आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून विविध गोष्टींसाठी विविध हॅशटॅग आपण तयार करू शकता. परंतु एक लक्षात ठेवा की हे टॅग्स आपण सतत वापरात ठेवा नाहीतर ते इतरांच्या पोस्ट्सच्या मागे जाऊन त्यांचा काहीच फायदा होणार नाही.

६. पेड प्रमोशनचा वापर
आपण सध्या जी सोशल मीडिया टूल्स वापरत असाल ती मोफत असतील. जसे फेसबुक पेज तयार करून त्यावरून पोस्टिंग करणे, विविध विषयांवर ट्विट करणे वगैरे. याशिवाय सर्व सोशल मीडिया टूल्स पेड प्रमोशन अर्थात पैसे भरून केलेले प्रमोशन आपल्याला उपलब्ध करून देतात. यांचा वापर करून आपण आपल्याला हव्या त्या लोकांपर्यंत आपली पोस्ट पोचवू शकता. उदा., आपल्याला जर आपल्या हॉटेल साठी आचारी नेमायचा आहे तर खाद्यपदार्थ बनविण्यात रस असलेल्या किंवा हॉटेल मॅनेजमेंट केलेल्या लोकांना आपण टार्गेट (ध्येय) ठेऊन त्यानुसार प्रमोशन करू शकता.

याशिवाय आपली कल्पनाशक्ती लढवून आपण विविध पद्धतीने आपल्या उद्योगासाठी योग्य व्यक्तीची निवड करू शकता.

परंतु यात एक लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे ते म्हणजे एखाद्या व्यक्तीला नोकरी देणे नक्की करण्या आधी त्याला प्रत्यक्षात सुद्धा भेटा कारण काही वेळा खरी व्यक्ती आणि सोशल मीडियावरील तीच व्यक्ती यांत अंतर असू शकते. त्यामुळे आपण प्रत्यक्ष अनुभव न घेता कुठलीही वचने देऊ नका.

– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)


महाराष्ट्रातील एक लाख उद्योजकांच्या ‘उद्योजक सूची’मध्ये तुमची नोंद झाली आहे ना?

Register Now: https://shop.udyojak.org/product/001/