Business Opportunity, Small Business

ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी एक आगळी- वेगळी उद्योगसंधी

ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी एक आगळी- वेगळी उद्योगसंधी

नोकरीच्या चौकटीत आयुष्य घालविण्यापेक्षा काहीतरी नवीन करू, जास्त पैसे कमावू, जलद गतीने प्रगती करू अशा भावनेने ग्रामीण भागातील अनेक तरुण आज शहरांकडे जाण्यापेक्षा ग्रामीण उद्योजकतेला प्राधान्य देत आहेत. यात त्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न असतो तो म्हणजे

मी कोणता व्यवसाय करू?

हा विचार करत असताना काहीतरी नवीन करण्याची इच्छा मागे पडत जाते व आपल्या आजूबाजूला जे उद्योग सुरु आहेत त्यातीलच एखादा पर्याय ते निवडतात. आपण जेव्हा कोणता उद्योग करायचा हा विचार करत असू तेव्हा दोन मुख्य बाबींचा विचार करणे गरजेचे असते.

एक म्हणजे कोणत्या उद्योगाला सध्या मागणी आहे

दुसरा व सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे या उद्योगाची भविष्यात मागणी वाढणार आहे का किंवा आता आहे तितकीच मागणी टिकणार आहे का.

हे दोन मुद्दे डोळ्यासमोर ठेवता ग्रामीण भागातील उद्योजकांना विविध सोयी-सुविधा पुरविणारी कंपनी ही एक उत्तम उद्योगसंधी उदयास येत आहे.

मुंबई- पुण्यासारख्या शहरांमध्ये सुतारकाम, बागकाम, लोहारकाम, कल्हई करणारे व्यक्ती इतके दिवस मिळत नसत. आज या गरजेला संधी मानून अर्बन क्लॅप सारख्या उद्योगांनी यात नफा शोधला आहे. अशाच प्रकारची संधी आज गावा-गावांत उपलब्ध आहे.

अनेक गावांत आज उद्योग करण्यासाठी उत्तमोत्तम उद्योजक तर तयार होत आहेत. परंतु त्यांना लागणाऱ्या ज्या विविध सोयी – सुविधा आहेत त्या त्यांना मिळत नाहीयेत. या सुविधांमध्ये पाडकरी- माळींपासून इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक अशा अनेकांचा समावेश आहे. हा उद्योग पुढील दोन प्रकारे केला जाऊ शकतो-


‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा!

शंभराहून अधिक व्यवसायांची माहिती असलेले ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’

हे ₹९९ चे ई-बुक या Lockdown काळात फक्त ₹३५ मध्ये उपलब्ध!!

अधिक माहितीसाठी : https://shop.udyojak.org/product/004/


१. एखादे क्षेत्र निवडून त्या संबंधित साहित्य पुरविणे.

जसे शेती हे क्षेत्र निवडले तर शेतकऱ्यांना भाड्यावर ट्रॅक्टर, इतर अवजारे उपलब्ध करून देणे, खतांचा पुरवठा करणे, इ. कमी भांडवल उपलब्ध असेल तर हा उद्योग आपण सुरु करू शकतो. उपलब्ध भांडवलात ज्या सोयी आपण पुरवू शकू त्या सुरु कराव्यात. पुढे आपल्याला जसजसा अनुभव येत जाईल व ज्याप्रकारची मागणी वाढत जाईल त्यानुसार पुढील गुंतवणूक कशात करायची याचा निर्णय आपल्याला घेता येईल.

उदा. आपण बागकामाची अवजारे पुरविणे सुरु केले आहे व तेव्हा आपल्याला समजले की आपल्या गावातील आंब्याची जुनी झाडे खूप उंच वाढली आहेत व आंब्यांचा सिझन जवळ आला आहे. अशावेळी आपण जर लांब आकाराचे ‘झेले’ विकत घेऊन भाड्यावर दिले तर आपल्याला थोड्या काळात जास्त नफा होऊ शकतो.

२. आऊटसोर्सिंग

अर्थात जिथे गरज आहे तिथे मुबलक प्रमाणात व्यक्तींचा पुरवठा करणे. बिझनेस मॉडेल समजायला सोपे जावे यासाठी एक उदाहरण घेऊ.

एखाद्या शेतकऱ्याकडे मोठी जमीन आहे, परंतु त्यावर काम करायला व उत्तम पीक घ्यायला त्याला २० माणसांची दोन महिन्यांसाठी गरज आहे. त्या २० माणसांना दोन महिने कामावर ठेऊन सर्वांना रोजगार देणे हे शेतकऱ्याला कठीण पडते. कारण यात खर्च तर जास्त असतोच शिवाय त्या लोकांच्या तक्रारी, त्यांची मागणी, काम करण्याच्या पद्धती या सर्वांची काळजी त्या शेतकऱ्यालाच घ्यायला लागते.

अशावेळी आपण जर आऊटसोर्सिंग फर्म काढून आपल्या हाताखाली काही व्यक्ती ठेऊन जिथे गरज आहे तिथे त्या व्यक्तींचा पुरवठा आपण करू शकतो. यातून चांगला नफा मिळू शकतो. आपल्याला केवळ व्यक्तींची अर्थात आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घ्यायची असेल, व्यक्तींचा रोजगार आपण देऊ व प्रति तास किंवा प्रति व्यक्ती शेतकऱ्याकडून ठराविक रक्कम घेऊ शकतो. यामुळे शेतकरी त्याचे मुख्य काम अर्थात उत्तम उत्पादन करण्यावर लक्ष केंद्रित करू शकेल व त्याच्यासाठी एकूण खर्च सुद्धा कमी होईल.

या उदाहरणात गणित लावले तर आपल्याला असे समजेल:

१. शेतकऱ्याने २० व्यक्तींना २ महिने (६० दिवस) कामावर ठेवले तर प्रत्येकी रु. १०० रोजगार धरल्यास दोन महिन्यांचा खर्च होतो रु.१,२०,०००/- (२० x ६० x १००). त्यांचे इतर खर्च, मागण्या तर वेगळ्याच!
२. आपण जर आऊटसोर्सिंग फर्म काढून दर व्यक्तीमागे केवळ रु.५० प्रति व्यक्ती प्रति दिन घेतले तर शेतकऱ्याचा खर्च सरळ अर्धा म्हणजेच रु. ६०,०००/- होतो.Indian Farmers Outsourcing

याचे शेतकऱ्याला होणारे फायदे:
– वरील गणिताप्रमाणे एकूण खर्च कमी होतो
– योग्य वेळेत योग्य व्यक्ती उपलब्ध असतात; कामासाठी व्यक्ती शोधण्यात वेळ जात नाही
– कर्ज काढून एकहाती सर्व पैसे देण्यापेक्षा काही रक्कम ऍडव्हान्स देऊन उरलेली रक्कम नंतर (सुगीच्या काळात) देऊ शकतो
– मुख्य कामांकडे लक्ष केंद्रित करणे शक्य होते
– साधारण किती व्यक्तींची गरज आहे हे आधीच ठरविल्यामुळे आयत्या वेळी त्यात लक्ष घालावे लागत नाही
– काम करणाऱ्या व्यक्तींच्या बहुतांश समस्या कंपनी सोडवते, शेतकऱ्यांवर ती जबाबदारी पडत नाही

आता आपल्याला असे वाटत असेल की शेतकऱ्यांनाच म्हणजेच ग्राहकांना याचा फायदा आहे, आपल्याला यातून नफा कसा काय मिळणार?

– आपल्याकडे जे व्यक्ती आहेत ते बाराही महिने कुठे ना कुठे काम करत असतीलच. हे दोन महिने संपले कि दुसऱ्या कुणा ग्राहकाकडे आपले व्यक्ती कार्यरत असतील.
– ठराविक काळासाठी सोयी पुरविण्याचे आधीच ठरले असल्याने अर्थात ग्राहकांसोबत कोंट्रॅक्ट झाले असल्याने त्या काळात आपण नवीन ग्राहक शोधून नवीन काँट्रॅक्टस करून ठेऊ शकतो.
– योग्य काळात योग्य व्यक्तींचा पुरवठा आपण करत असल्याने त्याचा मोबदला चांगला मिळू शकतो
– यात सुरुवात कमी व्यक्तींपासून करून पुढे आपला आवाका वाढवत नेणे शक्य आहे
– विविध पूरक क्षेत्रांतील कामे घेतल्यास उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या बळावर जास्तीत जास्त कामे मिळू शकतील.
– ठराविक रक्कम ऍडव्हान्स मिळाल्याने खर्चाचे गणित सोपे होईल
– आपल्या हाताखालील व्यक्तींना आपण दिवसाचा रोजगार देण्या ऐवजी एकत्रित महिन्याचा पगार देऊ शकतो ज्याद्वारे एकूण खर्च कमी होतो.

आता आपण केवळ शेती या क्षेत्राचे उदाहरण घेऊन ही संधी अभ्यासली.

याचप्रमाणे प्रत्येक गावात अशी असंख्य क्षेत्रे उपलब्ध आहेत ज्यात आपण या सेवा पुरवू शकतो. जसे अकाऊंटिंग सेवा, स्वच्छता सेवा, वाहतूक सेवा, रिपेअरिंग व मेंटेनन्स सेवा इ. यातील आपल्याला जे क्षेत्र नफा देणारे वाटत असेल त्या क्षेत्रात आपण हा व्यवसाय सुरू करू शकतो. सुरुवातीला केवळ साधन-सामग्री पुरविण्यापासून सुरुवात करून पुढे आपल्या हाताखाली शे-दोनशे व्यक्ती सुद्धा ठेऊ शकू!

– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)

Link to buy e-book named Ekvisavya Shatakatil Udyogsandhi

3 thoughts on “ग्रामीण भागातील उद्योजकांसाठी एक आगळी- वेगळी उद्योगसंधी

Comments are closed.