Small Business

Crowdfunding: हातात भांडवल नसताना व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग

Crowdfunding: हातात भांडवल नसताना व्यवसाय सुरू करण्याचा मार्ग

Crowdfunding म्हणजेच लोकवर्गणीतून उभी केलेली एखादी गोष्ट. २०१२ साली Crowdfunding ही संकल्पना अमेरिकेत उदयास आली. परंतु भारतात मात्र ही संकल्पना नवीन नाही तर फार जुनी आहे.

साध्या उदाहरणावरून बघू. भारतात गणेशोत्सव किंवा नवरात्रीसारख्या सणांमध्ये काही लोक एकत्र येतात. ज्याला जितके जमतील तितके पैसे प्रत्येक जण वर्गणी म्हणून देतो. या पैशांतून तो सण जोरदार साजरा केला जातो. हीच संकल्पना अमेरिकन उद्योजकांनी आपल्या व्यवसायात लागणारी गुंतवणूक उभी करण्यासाठी उपयोगात आणली. यालाच Crowdfunding म्हणतात.

जसे, एखाद्या व्यवसायाला दोन लाख रुपयांची गरज आहे. अशावेळी पारंपरिक रित्या एकाच गुंतवणूकदाराकडून सर्व रक्कम घेतली जाते. त्या मोबदल्यात त्याला ठराविक टक्के शेअर (भागीदारी) दिली जाते. या उलट Crowdfunding मध्ये अनेक लोकांकडून छोट्या रक्कमा घेतल्या जातात. जसे चाळीस लोकांकडून प्रत्येकी पाच हजार रुपये घेणे. या रक्कम अगदी लहान असल्याने त्या देणे एखाद्याला सहज शक्य असते.

या छोट्या-छोट्या गुंतवणुकीतून जो व्यवसाय उभा राहतो त्याला लोकवर्गणीतून उभा केलेला व्यवसाय म्हणजेच Crowdfunding म्हणतात.

Crowdfunding चे प्रमुख दोन प्रकार असतात.

● Equity-Based
● Reward-Based

Equity-Based Crowdfunding:

Equity Based म्हणजे ज्या व्यवसायासाठी Crowdfunding केले आहे त्या व्यवसायाची ठराविक मालकी प्रत्येक गुंतवणूकदाराला (पैसे देणाऱ्याला) मिळते. उदा. प्रत्येक गुंतवणूकदाराला त्या व्यवसायातील shares पैकी २% shares मिळतील.

Reward-Based Crowdfunding:

Reward Based म्हणजे प्रत्येकाने जितके पैसे गुंतवले असतील त्या किंमतीचे किंवा त्याहूनही अधिक लाभ त्या गुंतवणूकदाराला दिले जातात.

उदा. एका व्यक्तीला वेबसाईट बनविण्याचा व्यवसाय सुरु करायचा आहे. तो सुरु करण्यासाठी त्याला पन्नास हजार रुपयांची गरज आहे. स्वतःच्या खिशातून एकरकमी पन्नास हजार रुपये काढणे त्याला शक्य नाहीये. अशा वेळी तो दहा अश्या लोकांना शोधतो जे त्याला प्रत्येली पाच हजार रुपये देतील. या पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात तो त्या व्यक्तींना अशा वेबसाईट्स बनवून देतो ज्यांची किंमत पाच हजारांपेक्षा जास्त असते.

यात त्या व्यक्तीला भांडवल मिळाले, सुरुवातीचे ग्राहकही मिळाले व दहा गुंतवणूकदारांना पाच हजार रुपयांच्या मोबदल्यात त्याहून जास्त किमतीची वेबसाईट तयार करून मिळाली.

अर्थात, Crowdfunding ही संकल्पना भारतातील व्यवसायांमध्ये अजून फारशी रुजू झाली नाहीये. तरी भविष्यात या द्वारे अनेक उद्योजक विना गुंतवणूक आपला व्यवसाय सहजरित्या सुरू करू शकतील.

– टीम स्मार्ट उद्योजक