Small Business

आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्या कामात करायला हवेत हे पाच बदल

आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्या कामात करायला हवेत हे पाच बदल

इतकी वर्षं काम करण्याची पद्धत कितीही कंटाळवाणी असली, हाताने करायचे (Manual) काम असले, जुन्या पद्धतीचे असले तरी लोक ते काम करत. परंतु पुढची पिढी आता टेक्नोसॅव्ही होऊन कामातसुद्धा टेक्नॉलॉजी घेऊन येत आहे. तसेच आजच्या ग्राहकालासुद्धा व्यवस्थित आणि काटेकोर अशी सेवा अपेक्षित आहे. याशिवाय अनेक बदल आज घडत आहेत. या बदलांना आपण स्वीकारले नाही तर आपण काळाच्या पडद्याआड जायला लागू. त्यामुळे कामाच्या स्वरूपात घडलेले प्रमुख पाच बदल आपण पाहू.

१. ऐक्य

आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येक कर्मचाऱ्याला ऐक्याने काम करायला लावणे गरजेचे आहे. ही गरज केवळ उद्योजकाची नाही तर कर्मचाऱ्यांची सुद्धा आहे. जर उद्योगाचे ध्येय आणि आपले ध्येय वेगळे असेल तर कुणाचीच प्रगती हवी तशी होणार नाही. त्यामुळे आपले जे ध्येय आहे त्यानुसारच काम करण्याची जागा निवडणे गरजेचे आहे.

२. मोबाईल द्वारे काम

एका जागी बसून गठ्ठेच्या गठ्ठे चाळत काम करण्यापेक्षा मोबाईलवर काम करण्याला आजची पिढी जास्त प्राधान्य देते. काही प्रकारची कामे मोबाईल वर करणे शक्य नाही परंतु जास्तीत जास्त कामांचे डिजिटलायझेशन करणे बऱ्याच दृष्टीने उपयोगी आहे. एकतर पेपर वर्क वाचल्यामुळे पैशांची बचत होते शिवाय प्रवासात असताना किंवा अगदी घरी बसून सुद्धा कर्मचारी काम करू शकतात.

३. मोकळे वातावरण

एखादा व्यक्ती केवळ आपल्या जवळच्या बॉसशीच संवाद साधू शकतो हे वातावरण आता हळू हळू नष्ट होत आहे. याऐवजी ओपन डोअर पॉलिसी म्हणजेच कुणीही कुणाशीही मोकळेपणाने कामाबद्दल, तक्रारींबद्दल किंवा इतर काही कामाशी संबंधित गोष्टींबद्दल थेट चर्चा/ संवाद करू शकतो. आजच्या काळात ही पॉलिसी आपण आपल्या उद्योगात आणणे गरजेचे आहे. यामुळे आपण आपल्या कर्मचाऱ्यांना योग्य प्रकारे जाणून घेऊ शकता व आपल्या चुका आपल्या कर्मचार्यांकडूनच आपल्याला कळू लागतील.

४. योग्य संवाद

आज आपण पाहतो की अनेक लोक दर काही काळानंतर कंपनी बदलत असतात. याचा मोठ्या उद्योगांना फार फरक पडत नसेल तरी छोट्या उद्योगांना व स्टार्टअप्सना याचा खूप फरक पडतो. नवीन कर्मचारी निवडण्यात वेळ, कष्ट आणि पैसे हे सर्वच खर्च होते. त्यामुळे या काळात तक धरून राहण्यासाठी आपल्या कर्मचार्यांशी योग्य संवाद साधून आपुलकीची भावना निर्माण करणे गरजेचे आहे. एखाद्या उद्योगाला त्यातील कर्मचाऱ्यांनी आपलेसे मानले की ते कामही उत्तम करू लागतात.

५. ग्राहकहित

नवीन ग्राहक मिळविण्याशिवाय आहेत त्या ग्राहकांना समाधानी ठेवणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. एखाद्या उद्योगातून खरेदी करताना ते कोणत्या सोयी-सुविधा पुरवतात हे आज सर्वच ग्राहक पाहू लागले आहेत. जर आपण त्यांना हव्या तशा सोयी-सुविधा उपलब्ध करून देऊ शकलो, तर हे समाधानी ग्राहक आपल्याला त्यांच्या खरेदीतून नफा देतात, शिवाय ते आपले मोफत विक्रेते सुद्धा होतात.

या सारख्या अनेक गोष्टी कालानुरूप बदलत असतात. त्या बदलांना ओळखून, स्वीकारून जे उद्योजक अद्ययावत राहतात, ते नक्कीच यशस्वी होतात.

– शैवाली बर्वे
shaivalibarve@gmail.com


2 thoughts on “आपला व्यवसाय यशस्वी करण्यासाठी आपल्या कामात करायला हवेत हे पाच बदल

Comments are closed.