आज आपण वेगवेगळे स्टार्टअप्स उभे राहतात पाहतो. त्यातील काही खूप यशस्वी होतात तर काही पहिल्या तीन वर्षांतच बंद पडतात. सामान्यपणे ‘त्याची कल्पना/ आयडिया साधी असणार किंवा तो नवीन काहीच करत नसणार म्हणून त्याचा उद्योग बंद पडला’ असे म्हटले जाते. म्हणजेच स्टार्टअपची कल्पना किंवा नाविन्य याला सध्या खूप महत्त्व दिले जात आहे.
परंतु खरंच कल्पनेतच उद्योगाचे यश असते का?
आज आपण उद्योगाच्या यशात कोणकोणत्या गोष्टींचा किती प्रभाव पडतो हे पाहू.
एखाद्या उद्योगाचे यश साधारणपणे पुढील घटकांवर अवलंबून असते.
१. कल्पना
२. उद्योजकाची कौशल्ये
३. टीम
४. गुंतवणूक (Funding)
५. योग्य वेळ
६. बिझनेस मॉडेल
बऱ्याच जणांना वाटते की उद्योगाची कल्पना ही सर्वात महत्वाची असते.
परंतु खरे पाहता बऱ्याच यशस्वी उद्योगांचा अभ्यास केल्यावर पुढील क्रम आपल्याला दिसून येतो :
१. योग्य वेळ : एखाद्या उद्योगाची कल्पना कितीही उत्तम असेल पण चालू काळात जर त्या कल्पनेचा काही उपयोगच नसेल तर तो उद्योग यशस्वी होणे कठीण. यात दोन प्रकार असतात. एक म्हणजे अशा गोष्टींचा उद्योग करणे ज्या आधी खूप उपयोगी होत्या पण आता त्यांचा काहीच उपयोग नाही जसे टाईपरायटर.
दुसरे म्हणजे अशा गोष्टींचा उद्योग करणे ज्या भविष्यात खूप उपयोगी येऊ शकतात परंतु लोकांना आता त्या उपयोगी वाटत नाहीत. पहिल्या प्रकारात उद्योग करणे म्हणजे घाट्याचा सौदा ठरतो. दुसऱ्या प्रकारात जर आपण उद्योग करत असू तर लोकांना आपले उत्पादन कसे पटवून देता येईल, याचा आपण विचार करणे अनिवार्य ठरते. त्यामुळे आपला उद्योग कालसुसंगत आहे का नाही हे त्याच्या यशामागील सर्वात महत्त्वाचे कारण असते.
२. उद्योजकाची कौशल्ये : उद्योग कोणत्याही क्षेत्रातील असो, उद्योजकाच्या कौशल्यांवर त्याचा नफा अवलंबून असतो. एखादा उद्योजक बुडत असलेला उद्योगसुद्धा वर आणतो तर एखाद्याकडे सर्वोत्तम संसाधनं असूनही तो यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्या उद्योजकाकडे जर उद्योगाला लागणारी कौशल्ये असतील जसे मेहनत करण्याची तयारी, चिकाटी, वक्तशीरपणा, इ. तर तो कोणताही उद्योग यशस्वी करून दाखवू शकतो.
३. टीम : उद्योजकाची कौशल्ये ज्याप्रमाणे गरजेची आहेत, त्याचप्रमाणे त्याला कामात साथ देणारी माणसं सुद्धा त्या कामांसाठी पूरक हवीत. कोणते काम कोण करते आणि कशाप्रकारे करते याचा उद्योगाच्या यशावर मोठा परिणाम होतो.
योग्य व्यक्तीने एखादे काम करणे हे तर महत्त्वाचे आहेच व त्याशिवाय उद्यमशील असणे, पैशांपेक्षा कामाला जास्त महत्व देणे, वेळ फुकट घळविण्याऐवजी जास्तीत जास्त वेळेचा सदुपयोग करणे, भविष्याचा विचार करणे आणि सतत शिकण्याची तयारी हे सर्व जर असेल तर तो उद्योग यशस्वी होण्याची शक्यता नक्कीच वाढते.
४. कल्पना : व्यक्तीनंतर महत्वाची ठरते कल्पना. केवळ कल्पना उत्तम असणे हे यशाचे सूत्र नसले तरी एखाद्या उद्योगाच्या यशात कल्पनेचा मोठा वाटा असतो. उत्तम कल्पना ही कायम काहीतरी वेगळे किंवा नवीन शोध असेलच असे नाही; तर अशी गोष्ट करणे ज्यातून प्रत्यक्ष नफा मिळेल.
५. बिझनेस मॉडेल : बिझनेस मॉडेल अर्थात आपण विविध संसाधने वापरून त्यांचे उत्पादनात रूपांतर कसे करता आणि ते कशाप्रकारे विकून आपण नफा कमवता. म्हणजेच आपल्या उद्योगाची कल्पना आपण सत्यात कशी उतरवता याचासुद्धा आपल्या उद्योगाच्या यशात मोठा हात असतो.
६. गुंतवणूक (Funding) : बाकी पाच घटकांसोबत आपल्या उद्योगाला किती गुंतवणूक मिळते हे सुद्धा महत्वाचे आहे. ही गुंतवणूक आपल्याला वरील पाच घटकांद्वारे मिळते. यशस्वी होण्याच्या सूत्रांत गुंतवणूक सर्वात शेवटी आहे कारण गुंतवणूक मिळविण्याचे अनेकविध मार्ग असतात. याशिवाय वरील पाच घटक जर उत्तम असतील तर कमीत कमी गुंतवणुकीतही उद्योग यशस्वी होऊ शकतो.
या सहा गोष्टींचा मेळ जो उद्योजक घालतो, त्याचा उद्योग मोठा होत जाऊन तो नक्कीच यशस्वी होतो.
– शैवाली बर्वे