Uncategorized

आपण आपल्या उद्योगाचा नियमित पेस्ट (PEST) ऍनालिसीस करतो का?

आपण आपल्या उद्योगाचा नियमित पेस्ट (PEST) ऍनालिसीस करतो का?

एखादा उद्योग सुरू केल्यापासून अनेकविध घटकांचा त्यावर प्रभाव पाडत असतो. यातील काही घटक हे उद्योगांतर्गत असतात. जसे संस्थापक, भाग-भांडवल, कर्मचारी, ध्येये, उद्दिष्टे, धोरणे, इ. तर काही उद्योगाबाहेरील. उद्योगांतर्गत जे घटक असतात त्यांचा उद्योगावर पडणारा प्रभाव बऱ्यापैकी त्या उद्योगाच्या नियंत्रणात असतो. परंतु जे घटक उद्योगाच्या बाहेरील असतात, ते मात्र एखादा उद्योग आपल्या नियंत्रणाखाली आणू शकत नाही. हे घटक कोणते आहेत व त्यांचा आपल्या उद्योगावर कधी व कशाप्रकारे प्रभाव पडेल हे जो उद्योजक आधीच ओळखू शकेल, तो नक्कीच यशस्वी होईल.

हे बाह्य घटक आणि त्यांचा आपल्या उद्योगावरील परिणाम ओळखण्यासाठी आधी आपल्याला ते घटक नक्की कोणते आहेत हे जाणून त्यांचा बारकाईने अभ्यास करणे गरजेचे आहे. या घटकांचे पेस्ट ऍनालिसीस अंतर्गत चार प्रकार केले आहेत:

Political : राजकीय
Economic : आर्थिक:
Social : सामाजिक
Technological : तांत्रिक

केवळ ₹५०० मध्ये तुमचा #Brand पोहचवा ४०,०००+ लोकांपर्यंत!

Click to Know More: Ad in WhatsApp Updates


१. राजकीय घटक (Political)

राजकीय घटकांमध्ये राजकीय निर्णय, सरकारची स्थिरता आणि उद्योगपोषक वातावरण या गोष्टी येतात. एखादा उद्योग सुरू करतानाच्या नोंदणी प्रक्रियेपासून ते सरकारी निर्णय आणि योजनांनुसार कर भरण्यापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांत राजकीय घटक आपल्या उद्योगावर परिमाण करत असतात. यामुळे आपल्या देशात आणि राज्यात कोणत्या प्रकारचे राजकीय वातावरण आहे, देशातील सरकार स्थिर आहे की नाही, देशाचे राजकीय वातावरण उद्योगपोषक आहे की नाही, सरकार उद्योजकांसाठी कोणकोणत्या नवीन योजना राबवत आहे अशा अनेक गोष्टींवर उद्योजकांचे लक्ष असणे अनिवार्य आहे.

सरकारचा छोट्यात छोटा निर्णय सुद्धा एखाद्या उद्योगावर खूप मोठा परिणाम करू शकतो. जसे, एखाद्या उद्योजकाचा जर दारू बनवून ती विकण्याचा उद्योग असेल आणि त्या देशातील सरकारने पूर्वसूचना देऊन दारू वर बंदी घातली तर नक्कीच तो उद्योजक तोट्यात जाईल. तेच जर दुसऱ्या एखाद्या दारू विकणाऱ्या कंपनीने देशातील सारकरकरचा व्यवस्थित अभ्यास केला असेल आणि सरकारच्या निर्णयांवर त्याचे लक्ष असेल तर तो कदाचित आधीपासूनच दारू उत्पादनासोबत काचेचे ग्लासेस किंवा साधा सोडा वगैरेचे सुद्धा जोडउत्पादन सुरू करेल.

आपल्या देशातील राजकीय घटकांवर लक्ष ठेवणे जसे अनिवार्य आहे तसेच इतर संबंधित देशांतील राजकीय घटकांवर सुद्धा आपले लक्ष हवे. बऱ्याचदा इतर देशांतील राजकीय निर्णय सुद्धा आपल्या उद्योगांवर त्यांची छाप पडून जातात. जसे भारतातील नॉटबंदीचा फटका चीन सह अनेक देशांना बसला किंवा भारतात जेव्हा एल.पी.जी.(लिब्रलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन) लागू झाले तेव्हा अनेक बाहेरील देशांतील उद्योगांसाठी नवीन उद्योगसंधी निर्माण झाल्या.

यासर्वांमुळे आम्ही तर उद्योजक आहोत त्या राजकारणा वगैरेशी आमचा काही संबंध नाही असे यशस्वी होऊ इच्छिणाऱ्या उद्योजकांनी अजिबात डोक्यात ठेऊ नये!

२. आर्थिक घटक (Economic)

राजकीय घटकांसोबत उद्योजकाने आर्थिक घटकांवर सुद्धा व्यवस्थित लक्ष ठेवले पाहिजे. कारण हेच आर्थिक घटक एखाद्या व्यवसायाचा पाया असतात. यात पुढील घटकांचा समावेश होतो.

  • महागाई
  • मंदी
  • व्यापार चक्र (आर्थिक उलाढाल)
  • रोजगार
  • अर्थिक अभिवृध्दि (Economic Growth)
  • Price Level

या सर्व आर्थिक घटकांवर जर आपले लक्ष असेल तर यातून कोणतीही समस्या उद्भ़वण्या आधीच आपण योग्य ते निर्णय घेऊन त्या आपत्तीला आपली संधी बनवू शकतो.

३. सामाजिक घटक (Social)

कोणताही व्यवसाय आपल्या ग्राहकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे आपले ग्राहक, त्यांच्या आवडीनिवडी, सवयी, राहणीमान अशा अनेक बाबींचा उद्योजकाला बारकाईने अभ्यास करणे गरजेचे असते. सामाजिक घटकांमध्ये ग्राहक आणि त्यांच्या राहणीमानासह लोकसंख्या, कायदापद्धत, एखाद्या उद्योगाचे लोकांच्या मनातील चित्र, खरेदी पद्धत, धार्मिक परंपरा अशा अनेक गोष्टींचा समावेश असतो. या सर्व गोष्टी आपल्या ग्राहकांच्या एकदम जवळच्या असल्याने यांकडे बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. कारण यातूनच आपल्याला प्रत्यक्ष विक्री वाढवण्याच्या संधी मिळतात.

४. तांत्रिक घटक (Technological)

आज जगभरात तासा-तासाला नवनवीन तांत्रिक शोध लागत आहेत. उद्योगजगतातील प्रत्येक गोष्टीत आता सोपेपणा येऊ लागला आहे.

जसे आधी व्यवसायाची प्रसिद्धी केवळ वर्तमानपत्रातून प्रमोशन करून सुद्धा होत असे, त्यानंतर पोस्टर्स, फलक, रेडिओ, टी. व्ही., इ. आले व त्यापुढे सोशल मीडिया विकसित झाला आणि आता तो इतका प्रगत झाला आहे की आपला मराठी पुस्तकांचा व्यवसाय जर मुंबईत असेल तर आपण सोशल मीडिया द्वारे मुंबईतील मराठी माणसे, जी वेगवेगळ्या पुस्तक-प्रकाशकांमध्ये रस दाखवतात अशांना सुद्धा आपण टार्गेट करून फक्त त्यांच्यापर्यंत आपली जाहिरात पोचवू शकतो!

हे सर्व तांत्रिक बदल उत्पादनापासून ते ग्राहक ओळखणे, प्रमोशन, विक्री अशा सर्वच क्षेत्रांत होत असतात. त्यामुळे या धावत्या युगात आपल्याला तांत्रिक घडामोडींकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. नाहीतर आपला उद्योग कालपरत्वे मागे पडत जाईल.

एखाद्या उद्योगाचा संस्थापक हा एका बोटीवरील कॅप्टन सारखा असतो. ती बोट तो एकटाच जरी चालवत नसला तरी त्याला हव्या त्या दिशेत ही बोट जात असते. या बोटीच्या वाटेत अनेक अडथळे, वादळे (उद्योग बाह्य घटक) येत असतात. जो कॅप्टन या सर्वाचा आधीच अंदाज बांधतो, त्याची बोट सुरक्षित राहते आणि जो यांकडे दुर्लक्ष करतो, त्याची बोट लवकरच बुडते!

– शैवाली बर्वे
(shaivalibarve@gmail.com)