Marketing, Small Business

स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम

स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम

उद्योजकता शिकविणारा भारत सरकारचा मोफत कोर्स…

आजकाल भारतात उद्योग करू इच्छिणारे तरुण प्रचंड प्रमाणात आहेत. लोकांकडे अनेक उत्तम अशा कल्पना सुद्धा आहेत. परंतु प्रत्यक्ष उद्योग कसा उभा करावा आणि त्यापुढे तो कसा नोंदवावा, चालवावा हे सांगणारी कोणतीच मोफत संस्था नाही. हेच लक्षात घेऊन भारत सरकारने ‘स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम’ हा अभ्यासक्रम मोफत सुरू केला आहे.

रॉनी स्क्रुवाला यांच्या अपग्रॅंड सोबत तयार केलेला हा कोर्स आपण इंग्रजी किंवा अगदी हिंदी मधून सुद्धा करू शकतो. एखाद्या उत्तम उद्योगाला लागणाऱ्या कल्पने पासून उद्योग चालू करणे, त्याची नोंदणी करणे आणि अगदी गुंतवणूक मिळविण्यापर्यंत सर्व गोष्टी या अभ्यासक्रमात समाविष्ट केल्या आहेत.

या कोर्सचे वैशिष्टय म्हणजे केवळ चार आठवड्यांत रोज थोडा वेळ काढून आपण हा कोर्स पूर्ण करू शकतो. याशिवाय नुसते लिखित ज्ञान नाही तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाच्या व्हिडीओज वर यात जास्त भर दिला आहे. हा कोर्स पूर्ण केला की आपल्याला स्टार्टअप इंडिया कडून हा कोर्स पूर्ण केल्याबद्दल प्रमाणपत्र सुद्धा देण्यात येते.

हा अभ्यासक्रम तोंडओळख, सहा पाठ आणि फेसबुकच्या कोर्सची माहिती आशा तीन भागांत विभागला आहे.


‘स्मार्ट उद्योजक’ वाचा आणि उद्योजक व्हा!

शंभराहून अधिक व्यवसायांची माहिती असलेले ‘एकविसाव्या शतकातील उद्योगसंधी’

हे ₹९९ चे ई-बुक या Lockdown काळात फक्त ₹३५ मध्ये उपलब्ध!!

अधिक माहितीसाठी : https://shop.udyojak.org/product/004/


सर्वप्रथम रॉनी स्क्रुवाला आपल्याला या अभ्यासक्रमाची तोंडओळख करून देतात. त्यानंतर पहिल्या धड्यापासून वेगवेगळ्या गोष्टी शिकताना आपण त्या आपल्या व्यवसायात कशा वापरू, याची सुद्धा एक सूची आपल्याकडून तयार करून घेतली जाते. प्रत्येक पाठ हा विविध भागांमध्ये विभागला आहे आणि प्रत्येक भागात आपण काय शिकलो हे तो भाग झाल्यावर PDF स्वरूपात डाउनलोड सुद्धा करून ठेवता येते. याशिवाय आपले कोर्स कडे खरोखर लक्ष आहे ना हे पाहण्यासाठी अधून- मधून आपल्या परीक्षा सुद्धा घेतल्या जातात.

या कोर्समध्ये चर्चेसाठी सुद्धा एक वेगळा विभाग आहे. आपल्याला कोर्स बद्दल किंवा इतर काही प्रश्न असतील तर ते आपण यात विचारू शकतो. इतर विद्यार्थी या प्रश्नांची उत्तरे देतात. शिवाय आपणही इतरांच्या प्रश्नांवर उत्तरे देऊ शकतो. आपल्या ओळखीचे लोक सुद्धा हा कोर्स जर करत असतील तर आपण त्यांच्याशी या कोर्सच्या माध्यमातून कनेक्ट होऊ शकतो व त्यांच्याही प्रगतीचा आढावा घेऊ शकतो.

या कोर्स मध्ये पुढील मुख्य सहा विषय हाताळले आहेत:

१. कल्पना ओळखून तिचे मूल्यांकन करणे (idea identification and assessment)
२. उद्योगाचा कायदेशीर पाया उभारणे (building legal foundation)
३. आर्थिक बाजूचा अभ्यास (understanding financial basics)
४. उद्योगाचा आराखडा (business plan)
५. निधी उभारणे आणि उद्योगाचे मूल्यांकन (fund raising and valuation)
६. अटीपत्रक आणि गुंतवणूकदारांशी कसे बोलावे (pitching and termsheet)

हा कोर्स करण्यासाठी आपण स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅमच्या वेबसाईटवर जाऊ शकतो किंवा आपल्या मोबाईलवर याची App सुद्धा डाउनलोड करू शकतो.
● वेबसाईट : https://startupindia.upgrad.com/v/dashboard
● App : https://play.google.com/store/apps/details?id=com.upgrad.student.startupindia

स्टार्टअप म्हणजे काय, उत्तम व्यवसाय कसा करावा, व्यवसाय नोंदणी, पैसे कुठून आणावेत असे असंख्य प्रश्न नवउद्योजकांना पडत असतात. यांची उत्तरे मिळविण्यासाठी आणि प्रत्यक्ष त्यावर काम सुरू करण्यासाठी हा कोर्स उपयोगी आहे.

त्याचप्रमाणे आपल्या उद्योगाच्या प्रत्येक बाजूचा अभ्यास करून प्रगती करण्यासाठी हा कोर्स इतर उद्योजकांनी करणे सुद्धा तितकेच महत्वाचे आहे.


One thought on “स्टार्टअप इंडिया लर्निंग प्रोग्रॅम

Comments are closed.